अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार! आजच पक्षप्रवेश करणार

मुंबई, 13 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यासोबतच त्यांनी आमदारकीचा देखील राजीनामा दिला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान अशोक चव्हाण यांची पुढची राजकीय भूमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानंतर काल अशोक चव्हाण यांनी येत्या दोन दिवसांत पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांच्या राजीनाम्याच्या दुसऱ्याचं दिवशी अशोक चव्हाण हे आता भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशोक चव्हाण आज दुपारी मुंबईतील भाजपाच्या कार्यालयात भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.

राज्यसभेची उमेदवारी मिळणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीतील जाहीर कार्यक्रमात अशोक चव्हाण यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. यावेळी अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे किती नेते भाजपमध्ये जाणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशानंतर त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. मात्र, यासंदर्भातील अधिकृत घोषणा अद्याप जाहीर झालेली नाही.

येत्या निवडणूकीत भाजपला फायदा होणार

तत्पूर्वी, अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांच्या पक्ष सोडून जाण्याने काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर भाजपची ताकद नक्कीच वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *