काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का; बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा

मुंबई, 08 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याची माहिती बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करून दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाबा सिद्दीकी हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यामुळे बाबा सिद्दीकी हे काँग्रेस पक्ष सोडतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. तर आज बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. बाबा सिद्दीकी हे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होतील, असे म्हटले जात आहे. दरम्यान, गेल्या महिन्यातच माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी मोठा धक्का बसला आहे.

https://twitter.com/BabaSiddique/status/1755456516746850437?s=19

बाबा सिद्दीकी ट्विटमध्ये काय म्हणाले?

बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. “मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि हा 48 वर्षांचा महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या (INC) प्राथमिक सदस्यत्वाचा तातडीने राजीनामा देत आहे. मला व्यक्त करायचे असे बरेच काही आहे. परंतु, म्हणतात ना, काही गोष्टी बोलल्या नाहीत तर चांगले असते. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो.” असे ट्विट बाबा सिद्दीकी यांनी केले होते.

बाबा सिद्दीकी यांचा राजकीय प्रवास!

बाबा सिद्दीकी यांनी 1977 मध्ये किशोरवयातच राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी हे मुंबईतील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. ते वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातून 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. बाबा सिद्दीकी हे 1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग तीन वेळा आमदार होते. त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि कामगार राज्यमंत्री म्हणूनही काम केले होते. दरम्यान, बाबा सिद्दीकी हे इफ्तार पार्टीमुळे अनेकदा चर्चेत आलेले आहेत. ते ईदच्या निमित्ताने दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करतात. त्यांच्या या इफ्तार पार्टीत शाहरूख खान, सलमान खान यांसारख्या बड्या सेलिब्रिटींपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्ती येत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *