निवासी डॉक्टरांचा संप मागे; निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य

मुंबई, 08 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील निवासी डॉक्टरांनी त्यांचा नियोजित संप मागे घेतला आहे. राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर निवासी डॉक्टरांनी त्यांचा संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली. तसेच या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी त्यांचा संप मागे घेतला आहे. तत्पूर्वी, राज्यातील निवासी डॉक्टरांनी कालपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता.

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1755214690039513120?s=19

नवीन वैद्यकीय महाविद्यालयात वसतिगृहे असणार: अजित पवार

निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वसतिगृहांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत. विविध जिल्ह्यांत मंजूर करण्यात आलेल्या वसतिगृहांच्या बांधकामांना गती देण्यात यावी, अशा सूचना अजित पवारांनी या बैठकीत सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासनाने नवीन वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करताना त्याच्या आराखड्यात वसतिगृहाचा समावेश केला आहे. त्यामुळे नवीन महाविद्यालयांमधील डॉक्टरांना पहिल्या दिवसापासूनच चांगल्या दर्जाची वसतिगृहे उपलब्ध होणार आहेत. अस्तित्वातील वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठीचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला प्राधान्य देऊन तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करावीत. त्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे निर्देश अजित पवार यांनी यांनी दिले आहेत.

अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

तसेच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर आज घेण्यात आलेल्या निर्णयांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती देखील अजित पवारांनी दिली आहे. वसतिगृहांच्या दुरुस्तीदरम्यान विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करून देणे गरजेचे असते. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांच्या परिसरात पर्यायी मोकळ्या खोल्या मिळण्यात अडचणी येतात. अशावेळी गरजेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भाड्याने खोल्या घेऊन राहता येण्यासाठी ठराविक भाडे देण्यात यावे. शक्य असेल त्याठिकाणी त्यांना पर्यायी खोल्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना अजित पवार यांनी या बैठकीतून संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *