मुंबई, 07 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. त्यानंतर आता अजित पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल केल्यास सुप्रीम कोर्टाने आमची देखील बाजू ऐकून घ्यावी. तसेच सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात आमची बाजू ऐकून न घेता एकतर्फी निर्णय घेऊ नये, अशी विनंती अजित पवार गटाने या कॅव्हेट अर्जातून केली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट यासंदर्भात काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://twitter.com/ANI/status/1755121203709083656?s=19
अजित पवार गटाने कॅव्हेट दाखल केला
दरम्यान, निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला दिले होते. त्यांच्या या निर्णयावर शरद पवार गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात जाण्याची घोषणा केली होती. त्यामुळे अजित पवार गटाने देखील यासंदर्भात सावध भूमिका घेतली आहे. अजित पवार गटाकडून आता सुप्रीम कोर्टात कॅव्हेट अर्ज दाखल करण्यात आला आहे.
अजित पवार गटाकडून विजयोत्सव साजरा
तत्पूर्वी, निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. यावेळी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि मिठाई वाटून निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले. राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर अजित पवार यांचे आता अनेक ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सध्या अजित पवार यांना शुभेच्छा देत असल्याचे पहायला मिळत आहे.