मुंबई, 07 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या 5 हजार डिझेल गाड्यांचे येत्या काळात एलएनजी वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे. यासाठी किंग गॅस कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन आणि किंग गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कुरेशी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर आदी उपस्थित होते.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1754862318750445605?s=19
दरवर्षी 234 कोटी रुपयांची बचत होणार
एसटी महामंडळाच्या सुमारे 5 हजार डिझेल गाड्यांचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. या एलएनजी इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये सुमारे 10 टक्के घट होण्यास मदत होणार आहे. सोबतच एसटी महामंडळाची दरवर्षी 234 कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
येत्या 3 वर्षांत 5000 गाड्यांचे एलएनजीत रुपांतर होणार
दरम्यान, या करारांतर्गत येत्या 3 वर्षांत एकूण 6 टप्प्यांमध्ये एसटी महामंडळाच्या 5 हजार डिझेल वाहनांचे एलएनजी वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे. तसेच यावेळी राज्यातील एसटी महामंडळाच्या 90 आगारांमध्ये एलएनजी इंधन भरण्याची सोय करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.