भारतरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लालकृष्ण अडवाणी यांचे अभिनंदन केले

मुंबई, 03 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी असा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालकृष्ण अडवाणी यांचे अभिनंदन केले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे. अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारताच्या सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे हे आनंददायी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

https://twitter.com/mieknathshinde/status/1753691533981978625?s=19

अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहावे यासाठी रथयात्रा काढून आडवाणीजींनी जनजागृती केली: मुख्यमंत्री 

“सर्वसामान्य नागरिकांचे कल्याण, विकासाचा ध्यास आणि प्रखर हिंदुत्वाचा विचार अंगिकारत राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व लालकृष्ण आडवाणी जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर होणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहावे या विचाराने रथयात्रा काढून आडवाणीजींनी जनजागृती केली. अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्यावर आडवाणीजींच्या योगदानाचे स्मरण ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी हा पुरस्कार जाहीर केला, हे आपल्या भारतीय संस्काराचे द्योतक म्हणावे लागेल,” असे मुख्यमंत्र्यांनी यामध्ये म्हटले आहे.

आडवाणीजी आणि बाळासाहेब ठाकरे यांची अनोखी मैत्री होती: एकनाथ शिंदे

“तसेच आणीबाणी आणि त्यानंतर ढवळून निघालेल्या राजकीय पटलावर जनसंघ आणि भाजपच्या माध्यमातून देशहिताचा विचार मांडत राहून त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका कायम चोख निभावली. उपपंतप्रधान म्हणून त्यांचे योगदान कायम स्मरणात राहणार आहे. राजकारणातील तरुण पिढीसाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावणाऱ्या आडवाणीजी आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मैत्रीही अनोखी होती. हिंदुत्वाचा विचार आणि श्रीरामाचा ध्यास असलेली ही दोन व्यक्तिमत्वे सकारात्मक राजकीय साथीदार होते. भारतरत्न सन्मान जाहीर झाल्याबद्दल या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना प्रणाम.” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

https://twitter.com/Devendra_Office/status/1753701935512015078?s=19

हा कणखर व्यक्तिमत्त्वाचा यथार्थ सन्मान आहे: देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी देखील लालकृष्ण अडवाणी यांच्या सोबतचे त्यांचे खास फोटो सोशल मीडियावर शेयर करून त्यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. भारताचे माजी उपपंतप्रधान आणि आमचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर होणे, या एका कणखर व्यक्तिमत्त्वाचा यथार्थ सन्मान आहे, असे सांगत या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी यावेळी लालकृष्ण अडवाणींचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रसेवेत त्यांची मोठी भूमिका: फडणवीस

लालकृष्ण अडवाणी यांनी ‘लोहपुरुष’ या नात्याने एक कणखर गृहमंत्री म्हणून देशाची सेवा केली. विशेषत: श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली. सुमारे 6 दशके त्यांनी राजकारणात घालविली. एक निष्कलंक व्यक्तिमत्त्व तर ते आहेतच, शिवाय राष्ट्रसेवेत त्यांची मोठी भूमिका राहिली आहे. राजकारणात अशाप्रकारचे चारित्र्य त्यांनी सांभाळले आणि विविध विषयांचा त्यांचा सातत्याने व्यासंग राहिला. त्यांना भारतरत्न ही उपाधी जाहीर झाल्याबद्दल मला व्यक्तिगत आनंद झाला आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *