भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार! जमिनीच्या वादातून घडली घटना

उल्हासनगर, 03 फेब्रुवारी: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे. उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्यात ही घटना घडली. याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. तर या गोळीबार प्रकरणी 6 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून ही गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या गोळीबारात महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या या दोघांची प्रकृती स्थिर आहे.

https://twitter.com/ANI/status/1753534904736850206?s=19

गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या

यावेळी गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर महेश गायकवाड यांच्यावर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी त्यांच्या शरीरातील सर्व गोळ्या बाहेर काढल्या आहेत. तर सध्या रुग्णालयाच्या बाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.

पोलीस ठाण्यातच घटना घडली

गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात एका जमिनीचा वाद सुरू होता. त्यांचा हा वाद हिललाईन पोलीस ठाण्यात पोहोचला. हिललाईन पोलिसांनी या दोघांना पोलीस ठाण्यात बोलावले. काल सायंकाळी दोघेही पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी चर्चा सुरू असताना त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्येच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर बंदुकीतून 6 गोळ्या झाडल्या. या गोळीबाराच्या आवाजाने पोलीस ठाण्याच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर पोलिसांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *