अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला; 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर नाही

नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 सादर केला. भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या 10 वर्षात सखोल सकारात्मक परिवर्तन पाहिले आहे, भारतातील लोक आशेने भविष्याकडे पाहत आहेत. 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपले सरकार सत्तेवर आले तेव्हा देशासमोर मोठी आव्हाने होती. सरकारने त्या आव्हानांवर मात केली आहे, अशा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी म्हणाल्या. तसेच आपण गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, त्यांच्या गरजा आणि अपेक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1752930873350181095?s=19

https://twitter.com/ANI/status/1752943458049040576?s=19

कररचनेत कोणताही बदल नाही!

या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही, अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. यासोबतच त्यांनी कररचनेत कसलाही बदल केला नाही. यावेळी त्यांनी इन्कम टॅक्सच्या दरांमध्ये कोणताही बदल नाही, त्यामुळे गेल्यावर्षी जी कररचना होती, तीच कररचना यावर्षीही कायम राहणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1752935264803303822?s=19

2 कोटी घरे उभारण्यात येणार!

गेल्या 10 वर्षात 30 कोटी मुद्रा योजनेतून महिला उद्योजकांना कर्ज देण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना 70% घरे देण्यात आली आहेत. कोविड काळ असून देखील आम्ही पीएम आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 3 कोटी घरांचे बांधकाम पूर्ण केले. पुढील 5 वर्षांत आणखी 2 कोटी घरे बांधली जातील, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

अंगणवाडी सेविकांचा आयुष्मान भारत योजनेत समावेश

पंतप्रधान जनमन योजनेतून आदिवासी समाजाचा विकास झाला. तसेच देशातील 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा फायदा झाला असल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. सर्व आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचाही आयुष्मान भारत योजनेत समावेश केला जाईल. अंगणवाडी केंद्रे अद्ययावत करण्यात येणार आहेत. येत्या काळात लसीकरण बळकट केले जाईल. आयुष्मान भारत अंतर्गत, सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांना त्याच्या कक्षेत आणले जाईल, अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1752936430895301100?s=19

दरमहा 300 युनिट मोफत वीज

देशाची पुढील 5 वर्षे अभूतपूर्व विकासाची वर्षे असतील. केंद्र सरकारचे येत्या काळात 1 कोटी घरांना सौरउर्जा देण्याचे ध्येय असणार आहे. छतावरील सौरऊर्जेच्या माध्यमातून एक कोटी घरांना सौरऊर्जेद्वारे दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळू शकेल. त्यामुळे 15 ते 18 हजार रुपयांची बचत होणार आहे. अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात केली आहे.

7 लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांना कर भरावा लागणार नाही

देशात रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4 टक्क्यांनी वाढली आहे. करदात्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी मी त्यांचे आभार मानते. नव्या कररचनेत 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही, अशी महत्त्वाची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. करदात्यांच्या समस्या सोडवून त्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या

नऊ कोटी महिलांचा समावेश असलेल्या 83 लाख बचत गटांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे 1 कोटी महिला लखपती दीदी बनण्यास मदत झाली आहे. ते इतरांसाठी प्रेरणा आहेत. लखपती दीदींसाठीचे लक्ष्य 2 कोटींवरून 3 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशा निर्मला सीतारामन यावेळी म्हणाल्या.

9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या कॅन्सर संदर्भात लस देणार

सध्याच्या आरोग्य पायाभूत सुविधांचा वापर करून आम्ही अधिक वैद्यकीय महाविद्यालये निर्माण करू. आमचे सरकार 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या कर्करोगाची लस देणार आहे. मातृत्व आणि बालकांच्या विकासासाठी सर्वसमावेशक योजना तयार केली जाईल, असे निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *