मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वाहिली अनिल बाबर यांना श्रद्धांजली! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई, 31 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी यावेळी आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे. अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.

https://twitter.com/mieknathshinde/status/1752538753040798135?s=19

माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक गमावला: मुख्यमंत्री

“आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे किंवा रक्तदान शिबिरांचे आयोजन, कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून केलेले प्रयत्न असो किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच बाबर कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याकरता बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1752538041963655666?s=19

त्यांचे अकस्मात निघून जाणे मनाला अत्यंत वेदनादायी: देवेंद्र फडणवीस

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अनिल बाबर यांना ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे. “विधानसभा सदस्य अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ते सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य ते 4 वेळा विधानसभा सदस्य अशी प्रदीर्घ त्यांची राजकीय कारकिर्द राहिली. मतदारसंघातील प्रश्न घेऊन ते सातत्याने भेटत असत. त्यांचे असे अकस्मात आपल्यातून निघून जाणे, मनाला अत्यंत वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ओम शांती.” असे देवेंद्र फडणवीस या ट्विटमध्ये म्हटले आहे.

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1752549249106190800?s=19

शेतकऱ्यांसाठी झटणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं: अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अनिल बाबर यांना ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे. “खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनानं शेतकऱ्यांसाठी झटणारे, शेतीसंबंधित अडीअडचणी व पाणी प्रश्नाला तडीस नेणारे एक कार्यशील नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. अनिल बाबर यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.” असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *