भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का; रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले

विशाखापट्टणम, 29 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा 28 धावांनी पराभव केला. त्याबरोबरच 5 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशातच भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि फलंदाज केएल राहुल हे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. ते दोघे दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाहीत. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्यांच्या जागी सर्फराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1751924060341318120?s=19

दुखापतीमुळे दोघांनी घेतली माघार!

दरम्यान, हैदराबादमधील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी खेळताना जडेजाच्या हाताला दुखापत झाली होती. तसेच या सामन्यानंतर राहुलने देखील उजव्या बाजूच्या क्वाड्रिसिप्समध्ये दुखत असल्याची तक्रार संघाच्या व्यवस्थापनाकडे केली होती. त्यामुळे ते दोघे या कसोटीतून बाहेर पडले आहेत. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या दोघांच्या प्रगतीवर बीसीसीआयचे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.

अनुभवी खेळाडूंची उणीव भासणार!

तत्पूर्वी, इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यातून विराट कोहलीने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. तसेच आता रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुसऱ्या कसोटीत खेळणार नसल्याने या अनुभवी खेळाडूंची उणीव भारतीय संघाला जाणवणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना कठीण जाण्याची शक्यता आहे. तर रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सर्फराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. यांतील सर्फराज खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण, सर्फराज खानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या काही सामन्यांत चांगले प्रदर्शन केले आहे. तर वॉशिंग्टन सुंदर हा रवींद्र जडेजाला चांगला पर्याय आहे. त्यामुळे या दोघांची संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *