नवी मुंबई, 27 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने नवीन अध्यादेश काढला आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. हा विजय हा सकल मराठा समाजाचा आणि त्यासाठी जीवाची बाजी लावून झुंजलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच गेले सात दिवस कोणतेही गालबोट लागू न देता अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने हे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल सकल मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक आणि अभिनंदन केले. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या असून, कुणबी नोंदी शोधताना सगेसोयऱ्यांचा देखील त्यात समावेश करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
https://twitter.com/AHindinews/status/1751128621035704758?s=19
मराठ्यांना आरक्षण देण्याचे आश्वासन पूर्ण केले: एकनाथ शिंदे
यासोबतच शिंदे समितीला मुदतवाढ द्यायला मान्यता दिली. तसेच मराठा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत देखील तयारी दर्शवली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मराठ्यांना आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते ते मी पूर्ण केले आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे. आम्ही कधीही मतांसाठी निर्णय घेत नाही, आम्ही जनहितासाठी निर्णय घेतो. आम्ही सर्व मागण्या मान्य केल्या आहेत, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
हा विजय मराठा समाजाचा: मुख्यमंत्री
यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मराठा आंदोलनात जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांना देखील नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. हा विजय मराठा समाजाचा असून गुलाल उधळून आनंद साजरा करावा. हे सरकार आपल्यासोबत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या वेशीवर येऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची वाशी येथील शिवाजी चौकात भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्युस पिऊन उपोषण सोडले
त्यावेळी मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कपाळी विजयाचा गुलाल लावला. यावेळी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रेमाने पेढा भरवला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षण संदर्भातील नवीन अध्यादेशाची प्रत दिली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोसंबीचा ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण सोडले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, आमदार संजय शिरसाट, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे आदी उपस्थित होते.