मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन!

मुंबई, 26 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी, पोलीस बांधव आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1750761993865224285?s=19

शिवाजी पार्क मैदानावर राज्यपालांनी केले ध्वजारोहण

यासोबतच प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपाल श्री.रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी गेल्या वर्षभरात राज्य सरकारने केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसेच राज्यातील सर्व स्तरातील नागरिकांना न्याय देण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले. अटल सेतू, कोस्टल रोड, धारावी विकास, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील क्षमतावाढ प्रकल्प, मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड हायवे या प्रकल्पांमुळे राज्याचा सर्वांगीण विकासात मोलाची भर पडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विविध संरक्षण दलांचे शानदार संचलन

यावेळी संचलन सोहळ्यात भारतीय नौदल, गोवा पोलीस, एसआरपीएफ, मुंबई पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, महिला पोलिसांचे पथक, सी-60 पोलिसांचे पथक, रेल्वे पोलीस दल अशा विविध संरक्षण दलांनी शानदार संचलन केले. तसेच राज्य शासनाचे नगरविकास, मृद आणि जलसंधारण, उमेद, अल्पसंख्याक विभाग, आदिवासी विकास अशा विविध विभागांचे चित्ररथ देखील या संचलनात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *