कोप्पल, 25 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील गंगावती तालुक्यातील मरकुंबी गावातील दलित हिंसाचार प्रकरणी 98 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 28 ऑगस्ट 2014 रोजी गंगावती तालुक्यातील मरकुंबी गावात दलित हिंसाचाराची ही घटना घडली होती. या प्रकरणात एकूण 101 जणांना दोषी ठेवण्यात आले होते. या दोषींपैकी 98 दोषींना जन्मठेप आणि 5 हजार रुपयांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर इतर तीन दोषींना 5 वर्षे सश्रम कारावास आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाल्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
https://x.com/ANI/status/1849701350768246989?t=QAXEJOliJok3E3Bxvm3DrQ&s=19
काय आहे संपूर्ण प्रकरण?
जातीय हिंसाचाराशी संबंधित हे प्रकरण असून, ते 28 ऑगस्ट 2014 रोजी गंगावती तालुक्यातील मरकुंबी गावात घडले होते. यावेळी आरोपींनी दलित समाजातील लोकांची घरे पेटवून दिली आणि त्यांना मारहाण केली होती. त्यावेळी दलितांना दुकानांमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे ही हाणामारी सुरू झाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी अनेक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून याप्रकरणाचा पुढील तपास सुरू केला.
खटल्यादरम्यान 16 आरोपींचा मृत्यू
त्यानंतर या घटनेचा अनेक भागांत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यावेळी अनेक आंदोलने आणि निदर्शने करण्यात आली. या प्रकरणात 117 जणांना आरोपी बनविण्यात आले होते. त्यापैकी 16 आरोपींचा या खटल्यादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाचा खटला तब्बल 10 वर्षे चालला. दरम्यान, या प्रकरणातील पीडितांना अखेर न्याय मिळाला असला तरी या प्रक्रियेला बराच वेळ लागला आहे.