पुणे, 27 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी कोर्टात 900 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. याची माहिती पुण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 19 मे रोजी पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका पोर्श कारने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील आयटी इंजिनीयर असलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या तरूण-तरूणीचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातानंतर अल्पवयीन आरोपींचे आई, वडील, आजोबा आणि ससून रुग्णालयातील डॉक्टरांसह अन्य दोघांविरुद्ध पुणे गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. पुराव्यांशी छेडछाड आणि रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्याचा कट रचल्याप्रकरणी या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://x.com/ANI/status/1816856072369701065?s=19
तत्पूर्वी, या अपघातानंतर पोलिसांनी अल्पवयीन अटक करून त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले होते. तेंव्हा बाल न्याय मंडळाने या अल्पवयीन आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहून त्याला जामीन मंजूर केला होता. त्यामुळे बाल न्याय मंडळाच्या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर याप्रकरणी पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळासमोर नव्याने अपील केले. तेंव्हा बाल न्याय मंडळाने या अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी केली.
आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल
याशिवाय, पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात या अल्पवयीन आरोपीच्या आई, वडील, आजोबा यांना पोलिसांनी अटक केली आहे. हा अपघात झाल्यानंतर आरोपीच्या ड्रायव्हरला डांबून ठेवून मारहाण केल्याप्रकरणी या आरोपीच्या आजोबांना पोलिसांनी अटक केली होती. ड्रायव्हरने या अपघाताचा गुन्हा स्वतःच्या अंगावर घ्यावा, त्यासाठी अल्पवयीन आरोपीच्या आजोबाने ड्रायव्हरला मारहाण केल्याचे निदर्शनास आले होते. तसेच, या अपघातावेळी हा अल्पवयीन आरोपी दारूच्या नशेत ही कार चालवत होता. त्यामुळे त्याच्या रक्ताच्या नमुन्यात दारूचा अंश सापडू नये, यासाठी अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलांनी ससून रुग्णालयातील काही डॉक्टरांच्या मदतीने त्याच्या रक्ताचे नमुने बदलले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित डॉक्टरांसह अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांना अटक केली आहे. तर याप्रकरणात इतरही दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांच्या विरोधात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे जिल्हा कोर्टात 900 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
https://x.com/ANI/status/1805547328050544730?s=19
आरोपीची बाल सुधारगृहातून सुटका
दरम्यान, या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची 22 मे रोजी बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने 25 जून रोजी या अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला होता. यासंदर्भात त्याच्या आत्त्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना हायकोर्टाने पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातून सुटका केली होती.