भीषण रस्ता अपघातात 9 जणांचा मृत्यू, 23 जखमी

बेमेतरा, 29 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) छत्तीसगड राज्यातील बेमेतरा येथे एका पिकअपने रस्त्यावर थांबलेल्या एका वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला, तर 23 जण जखमी झाले असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यातील बहुतांश जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बेमेतरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काठिया पेट्रोल पंपाजवळ आज मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

https://twitter.com/AHindinews/status/1784767328523346371?s=19

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी याठिकाणी बचावकार्य सुरू केले. यावेळी पोलिसांनी जखमींना बाहेर काढून त्यांना बेमेतरा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींपैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना रायपूर एम्समध्ये पाठवण्यात आले आहे. तर मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. दरम्यान, बेमेतरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काठीया गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका वाहनाला या पिकअपने धडक दिली. ही टक्कर इतकी जोरदार होती की, या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारांसाठी दवाखान्यात नेत असताना आणखी एका जणाचा मृत्यू झाला.

एका कार्यक्रमातून परतत असताना अपघात

बेमेतरा येथील पाथरा गावातील हे सर्वजण पिकअप वाहनातून तिरैया गावात कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळी रविवारी रात्री ते परतत असताना त्यांचे पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका वाहनाला धडकले. या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *