सिल्लोड, 03 मे: (विश्वजीत खाटमोडे) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात आज एसटी बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत नऊ प्रवाशी गंभीर जखमी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी याठिकाणी बचावकार्य सुरू केले. यावेळी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जखमींना बसच्या बाहेर काढून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1786360759754051876?s=19
अपघातात बसची पलटी
हा अपघात झाला तेंव्हा या बसमध्ये जवळपास 66 प्रवाशी प्रवास करीत असल्याचे सांगितले जात आहे. तर बस ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यावेळी अजिंठा घाटात या बसची पलटी झाली. हा अपघात झाल्याचे कळताच पोलीस आणि स्थानिकांनी या अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या अपघातामुळे संबंधित एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या या अपघाताचा तपास पोलीस करीत आहेत.
नाशिक जिल्ह्यात एसटी बसचा अपघात
दरम्यान, मागील काही काळापासून एसटी बसचा अपघात झाल्याच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर 30 एप्रिल 2024 रोजी एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता. अपघातात एसटी बस मधील 10 प्रवाशी जागीच ठार झाले तर 30 प्रवासी गंभीर जखमी झाले होते. बसचा टायर फुटल्याने हा अपघात झाला होता.