मुंबई, 14 जून: (विश्वजीत खाटमोडे) घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात मंत्रालयात नुकतीच बैठक पार पडली. मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला माजी खासदार किरीट सोमय्या, घाटकोपर (पूर्व) मतदारसंघाचे आमदार पराग शहा, आपत्ती व्यवस्थापन संचालक लहुराज माळी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, भारत पेट्रोलियम निगम लिमिटेडचे व्यवस्थापक मौलिक कपाडिया, लोहमार्ग पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील अपघातग्रस्तांचे नातेवाईक यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
https://twitter.com/AnilPatil_NCP/status/1801268787473518870?s=19
मृतांच्या नातेवाईकांना 9 लाखांची मदत
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील 17 मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 9 लाख रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. यातील 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तसेच उर्वरित 4 लाख रुपये राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून देण्यात येणार आहेत. दरम्यान, राज्य शासनाकडून आतापर्यंत या दुर्घटनेतील 16 मृतांच्या नातेवाईकांना ही मदत देण्यात आली आहे. तर एका मृतांच्या नातेवाईकाशी संपर्क झाला असून, त्यांना देखील लवकरच ही मदत देण्यात येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
जखमींना देखील आर्थिक मदत
याशिवाय होंर्डिग कोसळलेल्या दुर्घटनेतील ज्या जखमींवर 7 दिवसांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात उपचार करावा लागला, अशा जखमींना प्रत्येकी 16 हजार रुपये देण्यात आले आहेत. त्यापेक्षा कमी कालावधीसाठी उपचार घेणाऱ्या रुग्णांना प्रत्येकी 5 हजार 400 रूपये तसेच काही रूग्णांना तात्काळ उपचार केले होते, त्यांना देखील राज्य सरकारकडून मदत करण्यात आल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. या दुर्घटनेतील ज्या रुग्णांना 6 महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी उपचार घ्यावा लागणार आहे, त्यासाठी विशेष बाब म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने संबधित रुग्णांवर उपचार करावे, असे निर्देश अनिल पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सरकार ठोस उपाययोजना करणार
राज्य सरकार या घटनेतील अपघातग्रस्तांना सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची पुनरावृत्ती भविष्यात अन्यठिकाणी होवू नये, यासाठी राज्य सरकार ठोस उपाययोजना करणार आहे. सर्व स्थानिक यंत्रणांसाठी सर्वसमावेशक एकस्वरूप नियमावली करण्यात येईल. वाहनांचा व होर्डिंग्सचा थर्ड पार्टी इन्शुरन्सबाबतही काटेकोर नियम करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. बीपीसीएल कंपनीने या दुर्घटनेत उपचार घेत असलेल्या व्यक्तींचा मदतीसाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव मंजूर करून या रूग्णांवर उपचार करण्यासाठी आर्थिक सहाय्य करावे, असे निर्देश यावेळी अनिल पाटील यांनी दिले आहेत.