मुंबई, 13 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारने आरोग्य विभागात 8 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मर्जीतील लोकांना करोडो रुपयांची कामे देण्यासाठी वाट्टेल ती शक्कल लढवून भ्रष्टाचार करण्याचे काम हे राज्य सरकार करीत असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. केवळ 7 दिवसांच्या शॉर्ट नोटीसवर 108 ॲम्ब्युलन्सचे तब्बल 10 वर्षांसाठी 8 हजार कोटींचे टेंडर काढण्यात आले. परंतू खरंतर कुठलेही टेंडर 3 वर्षांच्या पलिकडे ॲम्बुलन्सच्या पुरवठ्याचा नसतो, असे विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
https://twitter.com/VijayWadettiwar/status/1746057498606366770?s=19
ॲम्ब्युलन्सचे 10 वर्षांसाठी 8 हजार कोटींचे टेंडर काढले: वडेट्टीवार
“या टेंडरची कोणत्याही दृष्टीने चौकशी केली, तरीही हे काम 4 हजार कोटींच्या वर जाऊ शकत नाही. परंतु, आरोग्य विभागाच्या मंत्र्यासह त्या आयएएस अधिका-याला बदलीचा धाक देऊन तसेच केवळ 7 दिवसांची मुदत देऊन 8 हजार कोटींचा टेंडर त्या एका मर्जीतल्या माणसाला देण्यासाठी आणि त्यातून 4 हजार कोटी रुपये कमावण्यासाठी 8 हजार कोटींचा हा टेंडर काढण्यात आला आहे. यातून जनतेच्या पैशाची लूट सुरू होणार आहे. राज्य सरकारच्या तिजोरीवर आधीच कर्ज आहे. अशा परिस्थितीत राज्यातील मंत्री आणि संपूर्ण आरोग्य खातेच भ्रष्टाचारात बुडाले आहे. त्याचा कळस म्हणून आज हे 8 हजार कोटी रुपयांचे टेंडर केवळ 7 दिवसांच्या शॉर्ट नोटीसवर काढण्यात आले,” असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
टेंडर थांबवण्याची विनंती करणार: वडेट्टीवार
“4 हजार कोटी रुपयांच्या कामाला 8 हजार कोटी रुपये मोजणे आणि स्वत:च्या मंत्र्यांच्या जवळच्या नातेवाईकांना हे काम देणे, यामध्ये मंत्र्यांची पार्टनरशिप आहे. हे राज्य उध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. या सरकारने तिजोरी लुटून राज्याला अधोगतीकडे नेण्याचे काम सुरू केले आहे.” असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच आपण हे टेंडर थांबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी यावेळी म्हटले आहे.