मुंबईतील पेट्रोल पंपावर लोखंडी होर्डिंग कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी केली 5 लाखांची मदत जाहीर

मुंबई, 13 मे: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईत आज जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपर येथील एका पेट्रोल पंपावर आज मोठे लोखंडी होर्डिंग कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 8 झाली आहे. तर यामध्ये 54 जण जखमी झाले आहेत. एनडीआरएफ चे पथक घटनास्थळी उपस्थित आहे. सध्या याठिकाणी बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेतून आत्तापर्यंत 67 लोकांना वाचवण्यात यश आले असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. तर या होर्डिंगखाली आणखी 30 ते 35 लोक अडकल्याची भीती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आयुक्त भूषण गगराणी यांनी व्यक्त केली आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1790046785135657372?s=19

https://twitter.com/ani_digital/status/1790039015434932319?s=19

https://twitter.com/ddsahyadrinews/status/1790019524856623398?s=19

अनधिकृत होर्डिंग प्रकरणी तक्रार करणार 

घाटकोपर भागात जाहिरातीचे लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि जाहिरात कंपनीविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. हे होर्डिंग 120 स्क्वेअर फुटाचे असल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे या पेट्रोल पंपावरील हे मोठे होर्डिंग अचानकपणे कोसळले. त्यावेळी 70 ते 80 गाड्या आणि 100 हुन अधिक जण या होर्डिंग खाली अडकले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

https://twitter.com/AHindinews/status/1790042146763919622?s=19

मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी

दरम्यान, घाटकोपर भागात होर्डिंग कोसळण्याच्या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. “ही दुर्दैवी घटना आहे. घटनास्थळी बचाव पथक काम करत आहेत. सुमारे 57 अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च आणि नुकसान भरपाई सरकार उचलणार आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1790012970174468136?s=19

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1790051681603842171?s=19

गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले आहे. ” घाटकोपर परिसरात होर्डिंग्ज पडल्याने झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 47 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *