शरद मोहोळ हत्येप्रकरणी 8 जणांना अटक

पुणे, 06 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना काल दुपारच्या सुमारास पुण्यात घडली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिताच्या कलम 302, 307 आणि 34 आणि शस्त्रास्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या इतर संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

https://twitter.com/ani_digital/status/1743432236123517421?s=19



दरम्यान पुण्यात काल दुपारी कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर 3-4 हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याला तातडीने कोथरूड परिसरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याला यावेळी मृत घोषित करण्यात आले, असे यावेळी पोलिसांनी सांगितले. तत्पूर्वी, शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्यानंतर हे हल्लेखोर पसार झाले होते. त्यानंतर स्थानिक पोलिस विभाग आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या आरोपींचा शोध घेण्यासाठी नऊ पथके तैनात करून त्यांना पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, कोल्हापूरसह विविध ठिकाणी रवाना केले.



त्यानंतर पोलिसांनी पुणे सातारा रोडवर किकवी शिरवळ येथे एका स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून 8 जणांना अटक केली. यामध्ये दोन वकिलांचा देखील समावेश आहे. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून 3 गावठी पिस्तूल, 3 मॅगझीन, 5 जिवंत काडतुसे, 8 मोबाईल फोन या वस्तू जप्त केल्या आहेत. तर या आरोपींनी जुन्या वादातून शरद मोहोळची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या घटनेचा अधिक तपास सध्या पुणे पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *