दार्जिलिंग, 17 जून: (विश्वजीत खाटमोडे) पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे आज सकाळच्या सुमारास रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. यावेळी एका मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिली. मालगाडीने मागून दिलेल्या धडकेमुळे एक्सप्रेस ट्रेनचे तीन मागील डबे रुळावरून घसरले. या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये 25 जण जखमी झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. तसेच या अपघातात मालगाडीचा चालक आणि सहाय्यक चालक आणि कांचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनच्या गार्डचा मृत्यू झाला आहे. एनजेपीहून सियालदह कडे जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला सिलीगुडी ओलांडल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे कांचनजंगा एक्स्प्रेसला अपघात झाल्याने तेथील रेल्वेच्या 19 गाड्या रद्द करण्यात आल्या.
https://twitter.com/AHindinews/status/1802628860644938117?s=19
https://twitter.com/AHindinews/status/1802584703947755774?s=19
https://twitter.com/AHindinews/status/1802607213107876012?s=19
मदत आणि बचावकार्य सुरू
या अपघातात रेल्वेच्या मागील बाजूचा गार्ड डब्बा, दोन पार्सल व्हॅन आणि सामान्य डब्याचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. भारतीय रेल्वेचे अधिकारी पश्चिम बंगालमधील या घटनास्थळाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. रंगपानी स्टेशनजवळ मालगाडी आणि कांचनजंगा एक्स्प्रेस यांच्यात झालेल्या अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. एनडीआरएफची टीम सध्या हा ढिगारा हटवण्यात गुंतली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे कांचनजंगा एक्स्प्रेस ट्रेन अपघातस्थळाला भेट देण्यासाठी दार्जिलिंगला रवाना झाले आहेत.
https://twitter.com/PMOIndia/status/1802592292102181147?s=19
https://twitter.com/AshwiniVaishnaw/status/1802606819174687003?s=19
केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वे अपघाताबद्दल शोक व्यक्त करून प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच गंभीर जखमींना 2.5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपये दिले जातील. पीडितांना ही रक्कम वाढीव एक्स-ग्रेशिया म्हणून दिली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.