700 किलो ड्रग्ज जप्त, 8 परदेशी नागरिकांना अटक

पोरबंदर, 15 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) गुजरात एटीएस आणि एनसीबीने ड्रग्जविरोधात मोठी कारवाई केली आहे. गुजरातच्या पोरबंदर येथील समुद्रात एका बोटीतून अंदाजे 700 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी 8 परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.15) मध्यरात्री गुजरात दहशतवाद विरोधी पथक आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. या कारवाईसाठी त्यांना नौदलाचे सहकार्य लाभले. हे ड्रग्ज इराणी बोटीतून आणले जात होते. जप्त करण्यात आलेले हे मेथॅम्फेटामाईन नावाचे ड्रग्ज आहे.

https://x.com/ANI/status/1857369695290339706?t=NKEZWhn4_ywA8rC1BSG77A&s=19

8 नागरिकांना अटक

दरम्यान, एक नोंदणी असलेले जहाज मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेऊन भारताच्या समुद्र क्षेत्रात प्रवेश करणार असल्याची गुप्तचर यंत्रणेच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे एनसीबी, नेव्ही आणि गुजरात पोलिसांच्या एटीएसकडून सागर मंथन – 4 नावाचे ऑपरेशन सुरू करण्यात आले. या संयुक्त कारवाईत सुमारे 700 किलो ड्रग्ज घेऊन चाललेली बोट भारताच्या समुद्र क्षेत्रात पकडण्यात आली. त्यावेळी 8 परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली. बोटीवर सापडलेल्या 8 परदेशी नागरिकांनी ते इराणी असल्याचा दावा केला आहे. परंतु, त्यांच्याकडे कोणतेही ओळखीचे पुरावे नाहीत.

आतापर्यंत 3400 किलो ड्रग्स जप्त

तत्पूर्वी, एनसीबीने या वर्षाच्या सुरुवातीला एनसीबी मुख्यालयातील ऑपरेशन्स शाखेतील अधिकारी आणि भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि एटीएस गुजरात पोलिसांच्या गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांचे एक पथक तयार करून ऑपरेशन सागर-मंथन सुरू केले होते. या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत तीन वेगवेगळ्या प्रकरणात सुमारे 3 हजार 400 किलो वजनाचे विविध अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 11 इराणी नागरिक आणि 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व याप्रकरणी तुरूंगात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *