नागपूर, 16 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील सोनखांब येथे लग्नावरून परतत असलेल्या कारला एका ट्रकने धडक दिली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये एक जण जखमी झाला आहे. हे सर्वजण नागपूरच्या काटोल तालुक्यातील रहिवासी होते. जखमी व्यक्तीला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.
https://x.com/ANI/status/1735890804046954732?s=20
दरम्यान, हे सात जण रात्री उशिरा एका लग्नावरून घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्या कारला एका ट्रकने समोरून जोरदार धडक दिली. त्यामुळे या कारमधील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. हे सर्वजण नागपूर येथे एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच यावेळी स्थानिक नागरिक देखील घटनास्थळी पोहोचले.
त्यांनी पोलिसांच्या मदतीने जखमी व्यक्तीला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल केले. हा अपघात इतका भयंकर होता की, त्यामुळे या कारचा चुराडा झाला आहे. या अपघातात ट्रकचे देखील नुकसान झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची नोंद नागपूर ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे. तर या घटनेचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.