पुणे, 11 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांची एकूण संख्या 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 इतकी आहे. यामध्ये राज्यात एकूण दिव्यांग मतदारांची संख्या 6 लाख 41 हजार 425 इतकी असून, यात 3 लाख 84 हजार 69 पुरूष दिव्यांग मतदार आहेत. तर 2 लाख 57 हजार 317 दिव्यांग महिला मतदार आहेत. तसेच 39 दिव्यांग तृतीयपंथी मतदार आहेत. याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक दिव्यांग मतदार
राज्यातील मतदार नोंदणीमध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक दिव्यांग मतदार आहेत. पुणे जिल्ह्यात 88 हजार 937 मतदार आहेत. यात 48 हजार 626 पुरूष दिव्यांग मतदार, 40 हजार 301 महिला दिव्यांग मतदार, तर 10 तृतीयपंथी दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यानंतर ठाणे जिल्ह्याचा क्रमांक लागतो. ठाणे जिल्ह्यात 38 हजार 149 दिव्यांग मतदार आहेत. यात 21 हजार 573 पुरूष दिव्यांग मतदार, तर 16 हजार 576 महिला दिव्यांग मतदार आणि 3 तृतीयपंथी दिव्यांग मतदार यांचा समावेश आहे. मतदार नोंदणीमध्ये सर्वांधिक कमी दिव्यांग मतदार गडचिरोली जिल्ह्यात 6 हजार 43 मतदार आहेत. यामध्ये 3 हजार 710 पुरूष दिव्यांग मतदार आणि 2 हजार 333 दिव्यांग महिला मतदार आहेत.
तसेच या मतदार नोंदणीमध्ये राज्यात तृतीयपंथी दिव्यांग मतदारांची एकूण संख्या 39 इतकी आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक दिव्यांग मतदार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात 12 तृतीयपंथी दिव्यांग मतदार आहेत. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात 10, नांदेड जिल्ह्यात 6, ठाणे जिल्ह्यात 3, पालघर आणि जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी 2 तृतीयपंथी दिव्यांग मतदार आहेत. तसेच मुंबई उपनगर, लातूर, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 1 दिव्यांग तृतीयपंथी मतदार आहे. याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.