डोंबिवली, 23 मे: (विश्वजीत खाटमोडे) डोंबिवली एमआयडीसी मधील एका केमिकल कंपनीतील बॉयरलमध्ये आज दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये 48 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या कंपनीत एकामागून एक तीन स्फोट झाल्याचे म्हटले जात आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला होता. तसेच या स्फोटाच्या आवाजाने परिसरातील गाड्यांच्या आणि इमारतींच्या काचा फुटल्या होत्या. या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या याठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
https://twitter.com/ANI/status/1793576394028687687?s=19
https://twitter.com/mieknathshinde/status/1793606918671667665?s=19
मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
दरम्यान, या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. डोंबिवली एमआयडीसी विभागातील अंबर केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल तसेच वैद्यकीय पथक दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. सध्या बचावकार्याला प्राथमिकता देण्यात आली असून त्यानंतर या दुर्घटनेला जे कुणी जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून म्हटले आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1793617102999629899?s=19
फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करून या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. डोंबिवलीतील दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 48 जण जखमी झाले आहेत. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना. या जखमींवर एम्स, नेपच्यून आणि ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत आणि सर्व प्रकारची मदत केली जात आहे. ते सर्वजण लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. बचावकार्यासाठी विविध पथके आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी या ट्विटमधून दिली.
https://twitter.com/samant_uday/status/1793605567992541344?s=19
सामंत यांच्याकडून जखमींची विचारपूस
तत्पूर्वी, या दुर्घटनेतील जखमींवर सध्या जवळील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांनी जखमींच्या नातेवाईकांना धीर दिला. जखमींच्या उपचारासाठी लागणारा खर्च सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल, असे आश्वासन उदय सामंत यांनी यावेळी दिले. याप्रसंगी, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, मनसे आमदार राजू पाटील, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह शिवसेनेचे ठाण्यातील पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.