मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक, करोडोंचा मुद्देमाल जप्त

मुंबई, 26 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने दोन वेगवेगळ्या प्रकरणात ड्रग्ज आणि चरस यांची तस्करी करणाऱ्या एकूण 6 जणांना अटक केली आहे. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून 1.04 कोटी रुपयांचा उच्च प्रतीचा काश्मीरी चरस आणि 24 लाख रुपयांचे मॅफेड्रोन (एम.डी.) ड्रग्ज जप्त केले आहे. त्यासोबतच पोलिसांनी या आरोपींकडून 22 लाख रुपयांची रोख रक्कम देखील जप्त केली आहे.

https://twitter.com/MumbaiPolice/status/1739502074260566197?s=19

अंमली पदार्थ विरोधी कक्षाने एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. यावेळी भायखळा येथे गस्तीदरम्यान पोलिसांना दोन संशयित व्यक्ती फिरताना दिसले. यावेळी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे 1.04 कोटी रुपयांचे 1.8 किलोग्रॅम उच्च दर्जाचे काश्मीरी चरस सापडले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांची चौकशी केल्यावर आणखी एका व्यक्तीला अटक केली. त्या व्यक्तीकडून आणखी 800 ग्रॅम काश्मीरी चरस जप्त करण्यात आले. हा आरोपी काश्‍मीरचा रहिवासी असून तो मुंबईत अक्रोडाच्या पिशव्यांमध्ये लपवून काश्मीरी चरस घेऊन आला होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

तर दुसऱ्या एका कारवाईत, अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने 24 लाख रुपये किमतीचे 120 ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) ड्रग्ज जप्त केले. यावेळी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून 22 लाख रुपये रोख देखील जप्त करण्यात आले. यासंदर्भातील माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *