देशातील महिलांना 50 टक्के सरकारी नोकऱ्या राखीव ठेवणार, राहुल गांधींची मोठी घोषणा

मुंबई, 29 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास सरकारी नोकऱ्यांमध्ये देशातील महिलांना 50 टक्के जागा राखीव ठेवण्यात येईल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. “आजही 3 पैकी 1 महिलाच का नोकरी करते? 10 सरकारी नोकऱ्यांमध्ये एकच महिला का? 50 टक्के सरकारी पदांवर महिला असल्याने देशातील प्रत्येक स्त्रीला बळ मिळेल आणि सशक्त महिला भारताचे नशीब बदलतील,” असे राहुल गांधींनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. सध्या राहुल गांधी यांच्या या घोषणेची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1773581711827411043?s=19

 

महिलांचा वाटा कमी का?

“आजही 3 पैकी 1 महिलाच का नोकरी करते? 10 सरकारी नोकऱ्यांमध्ये एकच महिला का? भारतात महिलांची लोकसंख्या 50 टक्के नाही का? उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणात महिलांची उपस्थिती 50 टक्के नाही का? असेल तर मग व्यवस्थेत त्यांचा वाटा इतका कमी का? काँग्रेसची इच्छा आहे की, ‘अर्धी लोकसंख्या, पूर्ण अधिकार’, आम्ही समजतो की महिलांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर तेव्हाच होईल, जेव्हा देश चालवणाऱ्या सरकारमध्ये महिलांचे समान योगदान असेल,” असे राहुल गांधी यामध्ये म्हणाले.

महिलांसाठी सरकारी नोकऱ्या राखीव ठेवणार

“त्यामुळे सर्व नवीन सरकारी नोकऱ्यांमधील निम्मी भरती महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. आम्ही संसद आणि विधानसभेतील महिला आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या बाजूने आहोत. सुरक्षित उत्पन्न, सुरक्षित भविष्य, स्थिरता आणि स्वाभिमान असलेल्या महिला खऱ्या अर्थाने समाजाची शक्ती बनतील. 50 टक्के सरकारी पदांवर महिला असल्याने देशातील प्रत्येक स्त्रीला बळ मिळेल आणि सशक्त महिला भारताचे नशीब बदलतील,” असे राहुल गांधी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *