परभणी, 12 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची विटंबना केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (दि.11) परभणी शहरात बंद पाळण्यात आला. परंतु, या बंदच्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागले. यामध्ये आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ केल्याचे पहायला मिळाले. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच त्यांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज देखील केला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 50 जणांना अटक केली आहे. तसेच याप्रकरणात 8 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आज (दि.12) दिली आहे.
https://x.com/ANI/status/1867118850581598237?t=j51nIfg45OgTBL4NLqAQ3w&s=19
परभणीत शांततेचे वातावरण
काल दुपारी झालेल्या दगडफेकीनंतर शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणताना आम्ही घटनास्थळावरून या लोकांना ताब्यात घेतले. काल रात्री कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आम्ही काही लोकांना अटक केल्याची बातमी चुकीची आहे. असे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सांगितले. या घटनेत एक पोलीस अधिकारी आणि 9 पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. परभणीतील परिस्थिती काल दुपारनंतर नियंत्रणात आली. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. तसेच एसआरपीएफचे जवानही याठिकाणी उपस्थित आहेत. पोलिसांकडून सकाळी रूट मार्चही काढण्यात आला आहे. जिल्ह्यात आणि शहरात आता शांतता आहे, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
आठ गुन्हे दाखल
परभणीतील हिंसक आंदोलनानंतर आंदोलकांवर 8 प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये बेकायदेशीरपणे एकत्र येऊन दगडफेक आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 50 जणांना अटक करण्यात आली आहे. असे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची विटंबना केल्याप्रकरणी पोलिसांनी एका माथेफिरूला अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.