दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे 5 जवान शहीद

पूंछ, 22 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले आहेत. तर यामध्ये 2 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सध्या या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

https://twitter.com/PTI_News/status/1738050839283921072?s=19

दरम्यान, पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढेरा की गली आणि बुफलियाज दरम्यानच्या रस्त्यावर काल दुपारी चारच्या सुमारास लष्कराच्या जवानांना शोध मोहिमेच्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या वाहनांवर या दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यावेळी दहशतवाद्यांच्या या हल्ल्यानंतर लष्कराच्या जवानांनी देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात याठिकाणी बरेच तास चकमक सुरू होती. सध्या ढेरा की गली हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. लष्कर आणि पोलिसांचे उच्च अधिकारी या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अशी माहिती पीटीआय या वृत्त संस्थेने दिली आहे.

https://twitter.com/PTI_News/status/1738065360836812807?s=19



सुरक्षा दलांनी सध्या याठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच या परिसरात शोध मोहीम राबवली जात असून, परिसराची हवाई निगराणीही केली जात आहे. याशिवाय दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकही तैनात करण्यात आले आहे. रात्री परिसरात घेराव घातल्यानंतर आज सकाळपासून मोठ्या प्रमाणावर घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू झाली आहे.



तत्पूर्वी, एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत या भागात लष्करावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. काही आठवड्यापूर्वी राजौरी जिल्ह्यातील बाजीमल जंगलातील धरमसाल भागातील गोळीबारात 2 कॅप्टनसह 5 लष्करी जवान शहीद झाले होते. दोन दिवस चाललेल्या या चकमकीत अफगाणिस्तान-प्रशिक्षित लष्कर-ए-तैयबाच्या कमांडरसह दोन दहशतवादी मारले गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *