हैदराबाद, 25 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका आजपासून सुरू झाली आहे. यांतील पहिला सामना सध्या खेळविण्यात येत आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गेल्या 12 वर्षांत इंग्लंडला भारताच्या भूमीत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे ही मालिका जिंकावी, अशी आशा इंग्लंड संघ व्यक्त करीत आहे. मात्र, टीम इंडियाही मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात मैदानात उतरणार आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी ही कसोटी मालिका कठीण जाण्याची शक्यता आहे.
विराट कोहलीची 2 कसोटीतून माघार
तत्पूर्वी, विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतली आहे. तो वैयक्तिक कारणामुळे पहिल्या दोन सामन्यांत खेळणार नाही. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघात त्याच्याजागी केएल राहुल याला संधी देण्यात आली आहे. राहुल आता चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार आहे. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्माने शुभमन गिल याच्यावर देखील विश्वास दाखवला आहे. तो या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. दरम्यान, गेल्या काही सामन्यांत शुभमन गिलने चांगले प्रदर्शन केले नव्हते. त्यामुळे त्याच्या संघातील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, रोहित शर्माने त्याला पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यामुळे या सामन्यात शुभमन गिलने चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा त्याचे चाहते करीत आहेत. त्याचबरोबरच या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक म्हणून श्रीकर भरत याला पण अजून एक संधी मिळाली आहे.
खेळपट्टीवर कोणाला मदत मिळणार?
हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या खेळपट्टीवर नेहमीच फलंदाजांना मदत मिळते. येथील सपाट पिच अनेकदा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अनुकूल ठरते. मात्र, सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या डावात खेळपट्टी खराब झाल्यामुळे फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे चौथ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाची कसोटी लागणार आहे.
या चॅनलवर हा सामना दिसणार!
दरम्यान, या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 आणि कलर्स सिनेप्लेक्स चॅनलवर करण्यात येत आहे. तसेच हा सामना जिओ सिनेमा या ओटीटी ॲपवर देखील पाहता येणार आहेत.
भारतीय संघ:-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड संघ:-
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन स्टोक्स, (कर्णधार) जॉनी बेअरस्टो, बेन फॉक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, रेहान अहमद, मार्क वुड, जॅक लीच