हरियाणा, 05 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) इंडियन नॅशनल लोक दलाचे माजी आमदार दिलबाग सिंग आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या 20 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. या कारवाईत ईडीने त्यांच्या घरातून करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ईडीने विदेशी शस्त्रे, 300 काडतुसे, 100 हून अधिक दारूच्या बाटल्या आणि 5 कोटी रुपये रोख, 4 ते 5 किलो सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. तर सध्या याठिकाणी नोटा मोजणीचे काम अद्याप सुरू आहे. बेकायदेशीर खाण प्रकरणी त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
https://twitter.com/ANI/status/1743117067841359879?s=19
या कारवाईमुळे खाण व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे. यावेळी ईडीने दिलबाग सिंग यांचे घर, कार्यालय आणि विविध ठिकाणी एकाच वेळी छापा टाकला. तर सध्या दिलबाग सिंग यांच्या संपर्कात असलेल्या खाण व्यावसायिकांची चौकशी केली जात आहे. तसेच ईडी आता खाणकामाशी संबंधित कागदपत्रांची छाननी करीत आहे. गेल्या 24 तासांपासून हा छापा सुरू आहे. या कारवाईत ईडीला आतापर्यंत 5 कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय, ईडीच्या पथकाने 300 जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत. सोबतच 4 ते 5 किलो सोने देखील जप्त केले आहे. तर या कारवाईत अनेक खुलासे होण्याचा अंदाज आहे.
तसेच दिलबाग सिंग यांच्या घरात विदेशात बनवली गेलेली हायटेक शस्त्रे सापडली आहेत. त्यामुळे दिलबाग सिंग यांनी त्यांच्या घरात ही विदेशी शस्त्रे कशासाठी ठेवली होती? तसेच दिलबाग सिंग यांच्या घरी ही शस्त्रे कशी काय आली? याचा तपास आता ईडी करणार आहे. त्यांच्या घरी या वस्तू सापडल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान दिलबाग सिंग हे यापूर्वी इंडियन नॅशनल लोक दलाचे यमुनानगर मतदार संघातून आमदार राहिलेले आहेत.