मुंबई, 19 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि.17) आणखी 5 आरोपींना अटक केली होती. त्यानंतर या पाचही आरोपांना कोर्टाने 25 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी मुंबई पोलिसांनी कोर्टासमोर या आरोपींना 12 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. तर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत.
https://x.com/AHindinews/status/1847298285989740991?t=6zl-OfIuvhxBXPh_czG8zA&s=19
आरोपी बिश्नोई टोळीशी संबंधित?
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर दोन शूटर्सना अटक करण्यात आली असून, आणखी एक मुख्य शूटर अद्याप फरार आहे. त्यांचा सध्या शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेले हे आरोपी या शूटर्सना शस्त्रे आणि पैसे पुरवत होते. या पाचही आरोपींना डोंबिवली, अंबरनाथ आणि पनवेल परिसरातून अटक करण्यात आली आहे. याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तसेच हे सर्व आरोपी फोन कॉलद्वारे बिश्नोई टोळीशी जोडले गेले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्या दृष्टीने पोलीस या आरोपींची चौकशी करीत आहेत.
https://x.com/ANI/status/1847479387542999321?t=0k7sXG6h4ZZhIHRyrGKRKQ&s=19
आरोपींच्या मोबाईलमध्ये झिशान सिद्दीकी यांचा फोटो
दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आरोपींनी पोलीस चौकशीत मोठा खुलासा केला आहे. अटक केलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये पोलिसांना बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांचा फोटो आढळून आला आहे. या प्रकरणातील सूत्रधाराने झिशान सिद्दीकी यांचा फोटो शूटर्ससोबत स्नॅपचॅटद्वारे शेअर केला होता. तसेच शूटर्स आणि कट रचणाऱ्यांनी माहिती शेअर करण्यासाठी स्नॅपचॅटचा वापर केल्याचे देखील पोलीस तपासात उघड झाले आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.