कुवेत, 12 जून: (विश्वजीत खाटमोडे) कुवेत येथील मंगफ शहरात एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. या आगीत जवळपास 41 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांमध्ये बहुतांश भारतीयांचा समावेश आहे. ही सहा मजली इमारत असून, इमारतीच्या एका मजल्यावरील स्वयंपाकघरात सुरूवातीला आग लागल्याचे सांगितले जात आहे. तर या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा तपास सध्या केला जात आहे.
https://twitter.com/ANI/status/1800829573954953704?s=19
https://twitter.com/ANI/status/1800832762527813792?s=19
https://twitter.com/ANI/status/1800856078676357610?s=19
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
कुवेतमधील भारताचे राजदूत आदर्श स्वैका यांनी या दुर्घटनेनंतर मंगफ येथील घटनास्थळाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. तसेच कुवेत देशाचे उपपंतप्रधान शेख फहाद युसूफ सौद अल-सबाह यांनी ही आज घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी भारताचे राजदूत आदर्श स्वैका यांनी अत्यावश्यक कारवाई, आपत्कालीन वैद्यकीय व आरोग्य सेवेसाठी दूतावास अग्निशमन सेवा आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असल्याचे म्हटले आहे. जखमींना कुवेत येथील अल-अदान रुग्णालय, मुबारक अल-कबीर रुग्णालय आणि फरवानिया हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
https://twitter.com/ANI/status/1800849225829519806?s=19
https://twitter.com/ANI/status/1800846828797386938?s=19
https://twitter.com/ANI/status/1800839958204407829?s=19
राजदूतांनी जखमींची भेट घेतली
जखमींमध्ये 30 हून अधिक भारतीयांचा समावेश आहे. यावेळी भारताचे राजदूत आदर्श स्वैका यांनी या तिन्ही रुग्णालयात जाऊन आगीच्या घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी रुग्णांना दूतावासाकडून पूर्ण मदत होणार असल्याचे आश्वासन दिले. जवळपास सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यातील काहींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर या सर्व परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष आहे.