देवगड, 10 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) देवगड समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेल्या 4 तरूणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. ही घटना दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला धोकादायक समुद्र किनारा परिसरात अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1733541596820595184?s=19
समुद्र किनारी धोकादायक परिस्थिती असेल तर स्थानिकांकडून दिली जाणारी माहिती व प्रशासनाकडून दिला जाणारा इशारा याकडे पर्यटनासाठी गेलेल्यांनी दुर्लक्ष करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
दरम्यान, पुण्यातील एका खासगी अकादमीच्या विद्यार्थ्यांची सहल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे गेली होती. यामध्ये 35 जणांचा सामावेश होता. यावेळी त्यातील 4 तरूणी आणि 1 तरूण असे पाच जण समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र त्यांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाचही जण या पाण्यात बुडाले. ही दुर्घटना काल दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत 4 तरूणींचा मृत्यू झाला. हा तरूण अद्याप बेपत्ता आहे.
या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली. तसेच यावेळी पोलीस प्रशासन ही घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर सध्या या बेपत्ता तरूणाचा शोध घेतला जात आहे. तर काल रात्री उशिरापर्यंत हे शोधकार्य सुरू होते. या तरूणाचा शोध लवकरात लवकर लागावा, अशी अपेक्षा सर्वजण करीत आहेत.