दोडा, 15 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) जम्मू-काश्मीर मधील दोडा जिल्ह्यातील आसार या भागात बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. बटोटे-किश्तवाड राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. यावेळी ही बस 250 फूट दरीत कोसळली. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 19 जण जखमी झाले आहेत. यामधील 6 जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात ह्या बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, ही बस पलटी होऊन चक्काचूर झाली होती.
मनोज जरांगे पाटील आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
ही बस किश्तवाडहून जम्मूला जात होती. त्यावेळी हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफची पथके आणि स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू केले. त्यांनी काही जखमींना मोठ्या मुश्किलीने बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तर या बसमध्ये 55 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेकडे प्रशासनाचे लक्ष असून या अपघातातील लोकांना आवश्यक ती सर्व मदत देण्याचे निर्देश प्रशासनाकडून अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
उपांत्य फेरीच्या सामन्यांत पाऊस आला तर काय होणार? आयसीसीने सांगितले
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करीत मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोडा बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, “डोडा बस दुर्घटना दुःखद आहे. यामध्ये ज्यांनी जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे, अशी माझी इच्छा आहे.” तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. स्थानिक प्रशासनाला मदतीसाठी सूचना देण्यात आल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.
One Comment on “बस अपघातात 36 प्रवासी ठार; 19 जखमी”