रांची, 30 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील बंगल्यासह तीन ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. या छाप्यादरम्यान ईडीने त्यांच्या बंगल्यातून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. यावेळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या बंगल्यातून 36 लाख रुपये, 2 आलिशान कार आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. झारखंडमधील जमीन घोटाळ्याशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
https://x.com/ANI/status/1752219744516870556?s=20
मुख्यमंत्री हेमंत सोरेन फरार झाले!
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानासह इतर 3 ठिकाणी ईडीने काल छापा टाकला होता. दरम्यान ईडीचे पथक घटनास्थळी पोहोचले त्याच्याआधी हेमंत सोरेन हे अज्ञात स्थळी निघून गेले होते. सध्या ते फरार झाले आहेत. त्यांचा आता शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर, ईडीच्या पथकाने हेमंत सोरेन यांच्या विषयी विमानतळावर अलर्ट जारी केला आहे.
तब्बल 13 तास चौकशी सुरू होती
तत्पूर्वी, या छाप्यादरम्यान ईडीच्या पथकाने हेमंत सोरेन यांच्या बंगल्यावर सुमारे 13 तास झाडाझडती घेतली. रात्री उशिरापर्यंत ईडीचे पथक त्यांच्या बंगल्यात होते. यावेळी ईडीने त्यांच्या बंगल्यातून 2 कार आणि 36 लाख रुपयांच्या रोख रकमेसह काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत. तर यापूर्वी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीने 20 जानेवारी रोजी कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या रांची येथील शासकीय निवासस्थानी चौकशी केली होती. त्यानंतर, ईडीने त्यांना नवीन समन्स जारी केले होते. यामध्ये ईडीने त्यांना 29 किंवा 31 जानेवारी यांपैकी कोणत्याही दिवशी चौकशीसाठी येणार असल्याचे सांगितले होते.