भोसरी, 24 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) पिंपरी चिंचवडमधील भोसरी भागात आज सकाळी पाण्याच्या कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण मजूर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, ही टाकी कशी कोसळली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या दुर्घटनेचा पोलीस तपास करीत आहेत.
https://x.com/ANI/status/1849315624692171101?t=fx-VncijXJZQ_pHW5YnYqA&s=19
https://x.com/ANI/status/1849315628525793435?t=TyQr-SnFUzPWaSZfuCkL8A&s=19
पालिकेच्या आयुक्तांनी दिली माहिती
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला या घटनेची माहिती आज सकाळी 7 वाजता मिळाली. त्यानंतर पीसीएमसीचे अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी बचावकार्य सुरू केले. तसेच त्यावेळी जखमींना इंद्रायणीनगर येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत 3 मजुरांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. तर 7 मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सध्या मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तसेच या दुर्घटनेची संपूर्ण माहिती गोळा करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात दीड हजारांहून अधिक मजूर काम करीत आहेत. त्यासाठी याठिकाणी एका कंपनीकडून लेबर कॅम्प उभारण्यात आला होता. या मजुरांसाठी तेथे एक पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. परंतु, आज सकाळी या टाकीचा काही भाग कोसळल्याने ही दुर्घटना घडली. दरम्यान, या पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होते का? तसेच याठिकाणी लावण्यात आलेल्या लेबर कॅम्पला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची परवानगी होती का? यांसारखे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.