केरळमध्ये ख्रिश्चन समुदायाच्या कार्यक्रमात 3 स्फोट

कोची, 29 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) केरळमधील एर्नाकुलम येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज (दि.29) साखळी स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एका जणाचा मृत्यू झाला, तर 36 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान मृत्यू झालेली महिला असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज सकाळी घडली. सध्या याठिकाणी बचावकार्य सुरू आहे. यावेळी एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले की, “हॉलच्या मध्यभागी हा स्फोट झाला. मला 3 स्फोटांचे आवाज ऐकू आले. त्यावेळी मी मागे होतो. तेथे धुराचे लोट होते.”

अजित पवारांना डेंग्यूची लागण

तत्पूर्वी, केरळमधील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज सकाळी ख्रिश्चन धर्मीयांच्या प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित 3 दिवसीय प्रार्थना सभेचा आज शेवटचा दिवस होता. या प्रार्थना सभेला 2 हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. त्यावेळी सकाळी 9 च्या सुमारास याठिकाणी एकामागून एक 3 स्फोट झाले. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच, याठिकाणी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले. मग त्यांनी बचावकार्य सुरू केले. सध्या जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामधील 10 रुग्ण सध्या आयसीयू मध्ये आहेत, तर 2 जण व्हेंटिलेटरवर आहेत आणि 2 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या स्फोटांचा अधिक तपास सुरक्षा यंत्रणांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, देशभरात विविध ठिकाणी हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

मराठा आरक्षणसंदर्भात सरकार बैठक घेणार

या घटनेनंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, “ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आम्ही घटनेचा तपशील गोळा करत आहोत. एर्नाकुलममध्ये सर्व उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित आहेत. डीजीपी घटनास्थळी जात आहेत. आम्ही हे अतिशय गांभीर्याने घेत आहोत. मी डीजीपीशी बोललो आहे. तपासानंतर अधिक माहिती घ्यावी लागेल.” तत्पूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी बोलून एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी एनआयए आणि एनएसजीला घटनास्थळी पोहोचून घटनेची चौकशी सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर एनआयएचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. यावेळी एनआयए आणि स्थानिक पोलीस या स्फोटांचा संयुक्तपणे तपास करणार आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील यासंदर्भात लक्ष ठेवून आहेत. तर हा स्फोट कसा झाला आणि कशामुळे झाला? हे अद्याप समजू शकलेले नाही. याचा शोध तपास यंत्रणांकडून घेतला जात आहे.

One Comment on “केरळमध्ये ख्रिश्चन समुदायाच्या कार्यक्रमात 3 स्फोट”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *