विशाखापट्टणम, 02 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आजपासून खेळविण्यात येणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथील वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना सकाळी 9:30 वाजता सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंड संघाने जिंकला होता. या सामन्यात इंग्लंडने भारताचा 28 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे हा सामना जिंकून भारतीय संघ या मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. या सामन्यात टॉस जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1753260493505196484?s=19
https://twitter.com/BCCI/status/1753260828495942079?s=19
रजत पाटीदारचे पदार्पण, सिराजला विश्रांती
विराट कोहली या कसोटी सामन्यात देखील खेळणार नाही. त्याने वैयक्तिक कारणामुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांतून माघार घेतली आहे. त्याचबरोबर आजच्या सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल खेळू शकणार नाहीत. या दोघांना पहिल्या सामन्यात खेळताना दुखापत झाल्यामुळे त्यांनी या कसोटीतून माघार घेतली आहे. या अनुभवी खेळाडूंची उणीव भारतीय संघाला भासणार आहे. त्यामुळे आजच्या कसोटी सामन्यातून फलंदाज रजत पाटीदार याचे पदार्पण झाले आहे. तसेच रविंद्र जडेजाच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळाली आहे. तर मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी मुकेश कुमार संघात स्थान मिळाले आहे.
इंग्लंडच्या संघात दोन बदल
या कसोटीच्या एक दिवस आधी इंग्लंडने त्यांच्या संघाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. त्यांच्या संघात एकूण दोन बदल करण्यात आले आहेत. या सामन्यात जेम्स अँडरसनचे संघात पुनरागमन झाले आहे. अँडरसनला पहिल्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्याला मार्क वूडच्या जागी संघात स्थान मिळाले आहे. तसेच जॅक लीचच्या जागी शोएब बशीरला संधी देण्यात आली आहे. जॅक लीच याला पहिल्या सामन्यात खेळताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो हा सामना खेळू शकला नाही.
कशी आहे विशाखापट्टणमची खेळपट्टी?
हा सामना विशाखापट्टणममधील वाय एस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. या मैदानाच्या खेळपट्टीवर फलंदाजांना मदत मिळते. या मैदानावर नेहमी खूप धावा होताना दिसतात. त्यामुळे या सामन्यात देखील ही खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जो संघ आज टॉस जिंकेल तो प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणार आहे. कारण, या खेळपट्टीवर पहिल्या डावात फलंदाजी करण्यास सोपे आहे. तर येथे तिसऱ्या आणि चौथ्या डावात गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाचे 11 खेळाडू:-
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, रजत पाटीदार, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार,
इंग्लंडचे 11 खेळाडू:-
जॅक क्रोली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोकस (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.