गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत 27 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

राजकोट, 26 मे: (विश्वजीत खाटमोडे) गुजरातमधील राजकोट शहरातील गेमिंग झोनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुतांश मुलांचा समावेश आहे. यातील अनेक मुले याठिकाणी गेम खेळायला यायची. तर यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. राजकोट शहरातील नाना मौवा भागात असलेल्या टीआरपी गेम झोनमध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही आग लागली. दरम्यान, या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली.

अटकेची कारवाई

तर या आगीत अनेकांचे मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. अशा स्थितीत मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. अशा मुलांचे मृतदेह डीएनए चाचणीनंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या सूचना गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिल्या आहेत. तर या दुर्घटनेनंतर राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले की, “हा गेमिंग झोन युवराज सिंग सोलंकी नावाच्या व्यक्तीच्या मालकीचा आहे. याप्रकरणी निष्काळजीपणासाठी गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.” दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी सबंधित गेमिंग झोनच्या ऑपरेटर आणि व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी एसआयटी स्थापन

या दुर्घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आल्याची माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी दिली आहे. या दुर्घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्र्यांकडून घटनेचा आढावा घेतला आहे. त्यावेळी त्यांनी अधिक निष्पक्ष तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली गेली. तर जखमींना प्रत्येकी 50 हजार हजार रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

दरम्यान या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. “राजकोटमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेने अत्यंत व्यथित झालो. माझे विचार त्या सर्वांसोबत आहेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत. जखमींसाठी प्रार्थना. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.” असे नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *