मुंबई, 26 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यात 160 हून अधिक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो लोक जखमी झाले होते. याशिवाय पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले. या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्वांना आज राज्य सरकारकडून आदरांजली वाहण्यात आली.
https://x.com/mieknathshinde/status/1861285030208610740?t=HwuTEzXE_owxRtbb5igl5w&s=19
शहिदांना आदरांजली
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना अभिवादन केले. याप्रसंगी राज्याचे राज्यपाल सी. पी राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
26/11 चा मोठा दहशतवादी हल्ला
26/11 चा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या दिवसांपैकी एक मानला जातो. 21 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईत सागरी मार्गाने प्रवेश करून अनेक ठिकाणी गोळीबार आणि बॉम्बस्फोट घडवून आणला. या हल्ल्यात 160 हून अधिक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. तर 300 हून अधिक जण जखमी झाले होते. हा हल्ला चार दिवस चालू होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस यांसारख्या प्रसिद्ध ठिकाणांना लक्ष्य केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण मुंबई शहरात गोंधळाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या दहशतवादी हल्ल्यात सहभागी 9 दहशतवादी मारले गेले. तर आमिर अजमल कसाब हा दहशतवादी जिवंत पकडला गेला होता. त्याला कोर्टाच्या आदेशानुसार 2012 मध्ये पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.