26/11 हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याला 18 दिवसांची एनआयए कोठडी

दिल्ली, 11 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) 2008 साली मुंबईवर झालेल्या 26/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा याला अखेर भारतात आणण्यात यश आले असून, दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने त्याला 18 दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले आहे. शुक्रवारी (दि.11) रात्री उशिरा झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा निर्णय दिला.

https://x.com/ANI/status/1910442103257391526

भारतात आणण्यात यश

64 वर्षीय राणाला काल (दि.10) अमेरिकेहून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले. त्यानंतर एनआयएने त्याला त्याच दिवशी संध्याकाळी औपचारिक अटक केली. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून राणाला विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने तहव्वुर राणाला 18 दिवसांसाठी एनआयए कोठडीत पाठवले आहे. तत्पूर्वी, या सुनावणीत एनआयएने 20 दिवसांच्या रिमांडची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने त्याला 18 दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे तहव्वुर राणाला आता एनआयएच्या विशेष कारागृहात ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. जिथे कडक सुरक्षेत त्याची चौकशी केली जाईल.

26/11 च्या हल्ल्यात सहभाग

तहव्वुर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यात त्याचा थेट सहभाग असल्याचे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणात त्याचा सहकारी डेव्हिड हेडली याने राणाविरोधात महत्त्वपूर्ण माहिती पुरवली होती.

16 वर्षांपूर्वी अमेरिकेने अटक केली होती

त्यानंतर राणाला 2009 मध्ये एफबीआयने अमेरिकेतील शिकागो येथील एका विमानतळावर अटक केली होती. मुंबईत दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी लागणारी साधने व मदत पुरवल्याचा आरोप त्याच्यावर होता. हेडलीच्या साक्षीवरून अमेरिकेच्या न्यायालयाने त्याला 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर काही वर्षांनी भारताने अमेरिकेकडे राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. अखेर भारताच्या मागणीला आता यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *