मुंबई, 29 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजेते तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने त्यांच्या मूळ गावी स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील केडंबे गावात हे स्मारक उभारले जाणार असून, यासाठी राज्य सरकारने 13.46 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.
https://x.com/ANI/status/1905848460139806779?t=jhX8tnHzERZ8aDzkuogqqw&s=19
2.70 कोटी रुपयांचा निधी दिला
सातारा जिल्ह्यातील केडंबे गावात शहीद पोलीस अधिकारी तुकाराम ओंबळे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने 13.46 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. या मंजूर निधीपैकी पहिली 20 टक्के रक्कम म्हणजेच 2.70 कोटी रुपयांची रक्कम शुक्रवारी (दि.28) जिल्हा प्रशासनाकडे सोपवण्यात आली आहे, याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.
ग्रामविकास विभागाच्या सूचना
या स्मारकाच्या बांधकामाच्या खर्चाची अंतिम जबाबदारी सातारा जिल्हाधिकारी यांची राहील. त्यांनी सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून या स्मारकाचे बांधकाम करून घ्यावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्मारकाच्या कामाची वेळोवेळी प्रगतीची माहिती सरकारला सादर करावी. तसेच दिलेल्या वेळेत बांधकाम पूर्ण व्हावे आणि त्यासाठी दिलेला निधी खर्च व्हावा याची काळजी घ्यावी, अशा सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत.
26/11 च्या हल्ल्यात शहीद
शहीद तुकाराम ओंबळे यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांनी या दहशतवादी हल्ल्यात एकमेव दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या त्यागाचा सन्मान म्हणून महाराष्ट्र सरकारने हे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तर यापूर्वी तुकाराम ओंबळे यांना 26 जानेवारी 2009 रोजी अशोक चक्र हा मानाचा पुरस्कार देण्यात आला होता.