26/11 हल्ला प्रकरण : तहव्वूर राणा खटल्यासाठी नरेंद्र मान विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त

दिल्ली, 10 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) 26/11 मुंबई हल्ल्याच्या प्रकरणातील आरोपी तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली त्यांच्याविरुद्ध चाललेल्या खटल्यासाठी केंद्र सरकारने विशेष वकील नरेंद्र मान यांची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने रात्री उशिरा अधिसूचना जारी करून माहिती दिली आहे. या अधिसूचनेनुसार, वकील नरेंद्र मान येत्या तीन वर्षांसाठी दिल्लीतील एनआयएच्या विशेष न्यायालयात तसेच विविध न्यायालयांमध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित प्रकरणात सरकारची बाजू मांडतील.

https://x.com/ANI/status/1910174551067050269?t=KPvc8Z94tYpIIrEzNhyZ9g&s=19

तीन वर्षांसाठी नियुक्ती

गृह मंत्रालयाने स्पष्ट केले की, राष्ट्रीय तपास संस्था कायदा 2008 आणि भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 यांच्या तरतुदींनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. वकील नरेंद्र मान यांची ही नियुक्ती 3 वर्षांसाठी किंवा हा खटला संपेपर्यंत असणार आहे. असेही यामध्ये सांगण्यात आले आहे.

आज भारतात आणले जाईल

दरम्यान, दहशतवादी तहव्वुर राणा गुरूवारी (दि.10) दुपारपर्यंत भारतात पोहोचू शकतो. विशेष विमानाने त्याला अमेरिकेतून भारतात आणले जात आहे. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणाच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्याला दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या खटल्यात वकील नरेंद्र मान हे कोर्टात राणाच्या विरोधात महत्त्वाचे पुरावे सादर करतील, ज्यावरून त्याचे गुन्हे सिद्ध होतील, अशी अपेक्षा आहे.

दहशतवादी तहव्वुर राणा

तहव्वुर राणा 2008 च्या 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात वॉन्टेड असून, तो या हल्ल्याचा मास्टरमाईंड डेविड हेडलीला मदत करत होता. तो आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबा या संघटनांशी संबंधित असून, मूळ पाकिस्तानी असलेला कॅनेडियन नागरिक आहे. अमेरिका सुप्रीम कोर्टाने 25 जानेवारी 2024 रोजी त्याच्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. तर 2009 मध्ये एफबीआयने त्याला अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *