24 लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडले – प्रकाश आंबेडकर

वर्धा, 19 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वर्धा येथे सभा पार पडली. या सभेतून प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. “आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 जागा जिंकणार, असे वाटत आहे. मात्र त्यांना 150 देखील जागा जिंकता येणार नाहीत,” असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. तसेच सुमारे 24 लाख कुटुंबांनी देश सोडून इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे. ज्यांची स्थावर मालमत्ता ही 100 कोटीच्या आसपास होती. यात मुस्लीम आणि ख्रिश्चन नाहीत. तर ते सगळे हिंदू आहेत. आम्ही सांगितलेले हे आकडे खोटे आहेत का? ते सांगा, असे आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.

 

भाजपच्या निष्ठावंतांना खुर्च्या मिळेनात: प्रकाश आंबेडकर

“भाजप आरएसएसमधील निष्ठावान म्हणतात की, आमची वर सत्ता आहे आणि खाली ही पण सत्ता आहे. मात्र, आम्हाला बसायला खुर्चाच नाहीत त्या खुर्य्या दुसरेच पळवत आहेत,” असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. “जे भाजपमध्ये गेले आणि त्यांना उमेदवारी मिळाली, तर त्याचं काय खरं आहे असं मला वाटतं नाही. त्यांची आगीतून निघून फुफाट्यात गेले काय? अशी त्यांची परिस्थिती होण्याची शंका आहे,” अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

तर ईडी व्यापाऱ्यांच्या बोकांडीवर बसेल: प्रकाश आंबेडकर

“देशातील दडपशाहीचे धोरण निवडणुकांपर्यंत अजून वाढेल. काहीजण भाजपच्या गोटात जाणार आहेत. मी म्हणतो की, तुम्ही खुशाल जा. यामध्ये लाज लज्जा अजिबात ठेवू नका. पण, कुटुंबाला तुरुंगात जाण्यापासून वाचवा. आरएसएस – भाजपचे सरकार विरोधकांना धमकावत आहे, ब्लॅकमेलिंग करत आहे,” असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी या सभेतून केला. “मी व्यापाऱ्यांना चेतावणी देतो, आता राजकीय नेत्यांवर धाडी घालण्याचा नंबर लागला आहे. त्यांचा नंबर संपला आणि तुम्ही तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणलं, तर पुढचा नंबर तुमचा आहे हे लक्षात घ्या. त्यावेळी ईडी व्यापाऱ्यांच्या बोकांडीवर बसेल,” असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

धाडी टाकता, मग किती जणांना शिक्षा झाली? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

“धाडी घालणं वाईट आहे असं मी मानत नाही. ज्यांनी चुका केल्यात त्यांच्यावर धाडी घाला. पण दहा वर्षांत तुम्ही घातलेल्या धाडीपैकी तुम्ही एक धाड अशी दाखवा की, जे तुम्ही त्याचा सगळं रेकॉर्ड कोर्टापुढे मांडला आहे आणि कोर्टाने त्यांना सजा सुनावली आहे. धाडी टाकता, मग किती जणांना शिक्षा झाली?” असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारला केला आहे.

One Comment on “24 लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडले – प्रकाश आंबेडकर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *