मुंबई, 28 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) देशभरासह राज्यभरात मंगळवारी (दि.27) दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. मुंबईत दहीहंडी उत्सवात 238 गोविंदा जखमी झाले आहेत. याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. या जखमी गोविंदांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील अनेक गोविंदांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, किती गोविंदांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समजू शकलेली नाही. तत्पूर्वी, गेल्या वर्षी दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 195 गोविंदा जखमी झाले होते.
https://x.com/ANI/status/1828617568946659523?s=19
दहीहंडीचा उत्सव साजरा
दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यभरात दहीहंडीचा उत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यंदा देखील मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरांमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी चांगलीच स्पर्धा रंगली होती. यावेळी आयोजकांकडून लाखो रुपयांचे बक्षीस देखील ठेवण्यात आले होते. या दहीहंडी उत्सवात गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक सेलिब्रिटींना या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे गोविंदांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. दहीहंडी उत्सवादरम्यान आयोजकांकडून गोविंदांच्या सुरक्षितेसाठी अनेक उपाय योजना केल्या होत्या. परंतु, या दहीहंडी उत्सवात दुर्दैवाने 238 गोविंदा जखमी झाले. या जखमी गोविंदांवर मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीवर आयोजकांचे आणि प्रशासनाचे लक्ष आहे.
https://x.com/ANI/status/1828332964473614552?s=19
बलात्कार पीडितांना न्याय देण्याची मागणी
तत्पूर्वी, मुंबईतील वरळी येथील जांबोरी मैदानावर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. जिथे एक चिमुकला गोविंदा एक पोस्टर घेऊन आला होता. या पोस्टरच्या माध्यमातून त्याने बलात्कार पीडितांना न्याय देण्याची मागणी केली आहे. या पोस्टरवर लिहिले होते, “एका रात्रीत सरकार बदलू शकते. नोटाबंदी एका रात्रीत होऊ शकते. मग महिला बलात्कार करणाऱ्यांना एका रात्रीत का फाशी देता येत नाही? आम्हाला कँडल मार्च नको, आम्हाला न्याय हवा आहे.” त्याच्या या पोस्टरची चर्चा सर्वत्र रंगली होती.