बारामती, 05 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आता समाप्त झाली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात 36 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्जांच्या पडताळणीमध्ये त्यातील 4 उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत 9 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे यंदा बारामती मतदारसंघातून 23 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
बारामतीत काका विरूद्ध पुतण्या लढत
दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघात 23 उमेदवार उभे असले तरीही खरी लढत अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार यांच्यात पहायला मिळणार आहे. बारामतीत यंदा काका विरूद्ध पुतण्या असा सामना रंगणार आहे. या निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. तत्पूर्वी, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात नणंद विरूद्ध भावजय अशी लढत झाली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बारामतीकर कोणाच्या पाठीशी उभे राहतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामतीतील उमेदवारांची नावे
1) अजित अनंतराव पवार – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2) चंद्रकांत दादू खरात – बहुजन समाज पार्टी
3) युगेंद्र श्रीनिवास पवार – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
4) अनुराग आदिनाथ खलाटे – भारतीय प्रजा सुराज्य पक्ष
5) चोपडे संदिप मारूती – राष्ट्रीय समाज पक्ष
6) मंगलदास तुकाराम निकाळजे – वंचित बहुजन आघाडी
7) विनोद शिवाजीराव जगताप – संभाजी ब्रिगेड पार्टी
8) सोयल शहा युनूस शेख – समता पार्टी
9) अब्दुलरोफ जाफर मुलाणी – अपक्ष
10) अभिजित महादेव कांबळे – अपक्ष
11) अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले – अपक्ष
12) अमोल नारायण चौधर – अपक्ष
13) अमोल युवराज आगवणे – अपक्ष
14) कल्याणी सुजितकुमार वाघमोडे – अपक्ष
15) कौशल्या संजय भंडलकर – अपक्ष
16) चोपडे सीमा अतुल – अपक्ष
17) मिथुन सोपानराव आटोळे – अपक्ष
18) विक्रम भरत कोकरे – अपक्ष
19) शिवाजी जयसिंग कोकरे – अपक्ष
20) सचिन संजय आगवणे – अपक्ष
21) सविता जगन्नाथ शिंदे – अपक्ष
22) संतोष पोपटराव कांबळे – अपक्ष
23) संभाजी पांडुरंग होळकर – अपक्ष