पुणे, 04 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. पुण्यातील बोपदेव घाट परिसरात एका 21 वर्षीय तरूणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. गुरूवारी (दि.03) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पहाटे पाचच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणी तीन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, काल रात्री ही तरूणी आणि तिचा मित्र बोपदेव घाट परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी अनोळखी लोक त्यांच्याकडे आले आणि त्यांना मारहाण केली. त्यानंतर या तीन अज्ञात आरोपींनी या तरूणीवर सामूहिक बलात्कार केला.
https://x.com/ANI/status/1842139749428941165?t=4ctoXTwemHazzxYlaCVkTw&s=19
श्वान पथक घटनास्थळी दाखल
यादरम्यान त्या आरोपींनी तरूणीच्या मित्राला कपड्याने बांधले होते. आरोपींच्या शोधासाठी 10 हून अधिक पथके तैनात करण्यात आली असून, सध्या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत. सध्या या तरूणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेचा तपास करण्यासाठी शुक्रवारी (दि.04) पोलीस पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी श्वान पथकाच्या साहाय्याने घटनास्थळावरून पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला.
https://x.com/ANI/status/1842120166592651414?t=VYE1O-wvsZ_lLJOFJjUwlg&s=19
सुप्रिया सुळे यांच्याकडून फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी
या घटनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “मागील काही दिवसांपासून माझ्या मतदारसंघातील अशी ही दुसरी घटना आहे. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था सर्वच बाबतीत बिघडलेली आहे. अशी प्रकरणे रोज आपल्यासमोर येतात. पुणे ही राज्याची गुन्हेगारी राजधानी बनली आहे. हे राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारचे अपयश आहे. अशा गुन्ह्यांनंतर गृह मंत्रालय कोणतेही वक्तव्य करत नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.