पुणे, 22 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरातील अंमली पदार्थ विरोधी पथक 1 आणि गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी कोंढवा परिसरात मोठी कारवाई केली आहे. त्यावेळी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून 1.90 किलो इतकी आफिम जप्त केली. या आफिमची किंमत 21.80 लाख रुपये इतकी आहे. नाथुराम जीवणराम जाट (वय 52) असून तो मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. त्याच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस ॲक्टच्या कलम कलम 8 (क), 17(ब) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.
दरम्यान, पोलिसांच्या पथकाला पुण्याच्या कोंढवा परिसरातील उन्नती धाम सोसायटीच्या बाहेरील सार्वजनिक रोडवर एक संशयित व्यक्ती लाल रंगाची ट्रॅव्हलबॅग घेऊन उभा दिसला. त्यानंतर पोलिसांनी त्याला थांबवून त्याचे नाव-पत्ता विचारला, तसेच पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या ट्रॅव्हलबॅगमध्ये 1 किलो 90 ग्रॅम आफिम असल्याचे आढळून आले. पोलिसांनी अधिक तपास केल्यावर या आरोपीने त्याचे नाव नाथुराम जीवणराम जाट असल्याचे सांगितले. तसेच त्याने तो मूळचा राजस्थानच्या नागोर जिल्ह्यातील असावरी असल्याची ही माहिती पोलिसांना दिली.
अल्पावधीत पैसे कमावण्याच्या हेतूने आफिम विक्री
या आरोपीने तपासाच्या दरम्यान सांगितले की, तो पुण्यात फर्निचर बनवण्याच्या कामासाठी आलेला होता. परंतु, अल्पावधीत पैसे कमावण्याच्या उद्देशाने त्याने ही आफिम विक्री करण्यासाठी पुण्यात आणली होती. त्याच्याकडील 1 किलो 90 ग्रॅम वजनाची आफिम पोलिसांनी जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या आफिमची किंमत 21 लाख 80 हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांची यशस्वी कारवाई
पुणे पोलीस दलातील एका विशेष पथकाने अंमली पदार्थांच्या विरोधात मोहीम राबवली आहे. या अंतर्गत पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, उप पोलीस आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे आणि सहा पोलीस आयुक्त (गुन्हे 1) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे आणि पोलीस अंमलदार दयानंद तेलंगे पाटील, संदीप शिर्के, विशाल दळवी, सचिन माळवे, प्रवीण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, ज्ञानेश्वर घोरपडे आणि योगेश मोहिते यांनी ही वरील कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.