रामेश्वरम् कॅफे स्फोट प्रकरणी एनआयए कडून 2 दहशतवाद्यांना अटक

बंगळुरू, 12 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) कर्नाटक राज्यातील बंगळुरूमधल्या रामेश्वरम् कॅफे स्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज दोन फरार दहशतवाद्यांना अटक केली आहे. मुसावीर हुसैन शाजिब आणि अब्दुल मतीन ताहा असे अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. त्यांना एनआयएने कोलकाता येथून अटक केली. त्यामुळे बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळालेले हे मोठे यश आहे.

https://twitter.com/ANI/status/1778652451794473288?s=19

दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले होते

दरम्यान, या दहशतवाद्यांनी बेंगळुरू येथील रामेश्वरम् कॅफेमध्ये गेल्या महिन्यात 1 मार्च रोजी आयईडी स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात नऊ जण जखमी झाले होते. त्यानंतर या स्फोटाचा तपास एनआयएने सुरू केला. या स्फोटाच्या कटात मुसावीर हुसैन शाजिब आणि अब्दुल मतीन ताहा सहभागी असल्याची माहिती एनआयएला तपासातून मिळाली. त्यानंतर एनआयएने या दोघा दहशतवाद्यांचे फोटो आणि त्यांची माहिती शेयर केली होती. तसेच त्यांनी या दहशतवाद्यांवर 10 लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते.

https://twitter.com/ANI/status/1778653323706376492?s=19

गुप्त माहितीच्या आधारे अटक

त्यानंतर मुसावीर हुसैन शाजिब आणि अब्दुल मतीन ताहा हे दोघे कोलकाता येथील पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील एका ठिकाणी लपून बसले असल्याची गुप्त माहिती एनआयएला मिळाली. या माहितीच्या आधारे एनआयएने आज त्याठिकाणी छापा टाकून या दोघा दहशतवाद्यांना अटक केली. ते दोघे येथील एका हॉटेलमध्ये वेगवेगळ्या नावाने गेले तीन चार दिवस थांबले असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान एनआयएने रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड म्हणून मुसावीर हुसेन शाजिबचे नाव दिले आहे. कॅफेमध्ये आयईडी ठेवल्याप्रकरणी त्याला मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. तर अब्दुल मदिन ताहा हा या प्रकरणातील सहकारी सूत्रधार आहे. तर या तपासात एनआयएला केंद्रीय गुप्तचर संस्था आणि पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळ पोलिसांनी सहकार्य केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *